राजमाता सुमित्राराजे भोसले
श्रीमंत मनाचे एक पुण्यशील दर्शन म्हणजे राजमाता सुमिनाराजे भोसले. राजमाता राष्ट्राचे सात्विक वैभव होत्या. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान होत्या. मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू होत्या. सुसंस्कृत, सोज्ज्वळ, कनवाळू व्यक्तिमत्त्वाच्या राजस आविष्कार होत्या. छत्रपती शिवरायांचा क्षात्रधर्म व मानवधर्म भक्तिभावाने जपणाऱ्या राजमाता संसारश्रांतांची सावली अनाव जिवांची माऊली होत्या. अजिक्यतान्याच्या पायथ्याशी असणारा अदालतवाडा आणि त्या वाड्यातील आईसाहेबांचे वास्तव्य हा शाहूनगरवासीयांच्या आधाराचा, आदराचा नि अभिमानाचा अविभाज्य भाग होता. आईसाहेबांनी रयतेवर लेकराप्रमाणे प्रेम केले. माणसाविषयीची स्नेहधारा सदैव त्यांच्या अंतःकरणातून पाझरत असायची.
मध्य प्रदेशातील राजा भोजदेवाची कीर्तिपरंपरा लाभलेले धारचे संस्थान है राजमातांचे माहेर. हिज हायनेस श्री. उदाजीराव पवार व हर हायनेस सौ. लक्ष्मीदेवी यांच्या पोटी नवरात्र उत्सवात १५ ऑक्टोबर १९२३ या दिवशी त्या जन्माला आल्या. जन्मकाळातील नवरात्रीच्या देवीचा वसा घेऊन त्या अन्यायाविरुद्ध लढल्या, प्रेम, करुणा, शांतीचा उत्कट मंत्र जपत माणसासाठी शिजल्या ऊर्मिलाराजे हे त्यांचे माहेरचे नाव. १९३९ मध्ये सातारचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्या सुमित्राराजे झाल्या. छत्रपती शाहू महाराज लोकसंग्राहक, साहसी होते. १९४१ पासून चार वर्षे सैन्यात ते कॅप्टन होते. शिकारीचा त्यांना छंद होता.
सुमित्राराजेंचे व्यक्तिमत्वही प्रगल्भ व प्रसन्न होते. इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग दांडगा होता. उर्दू, हिंदी भाषा त्यांना उत्तम अवगत होत्या. घोड्यावर बसणे, बंदूक चालवणे, पोहणे, बॅडमिटन, टेनिस खेळणे यांत त्या पारंगत होत्या. सासूबाईकडून त्या नऊवारी साडी, नय, अंबाडा घालायला शिकल्या. स्वाभिमानाचे व करारीपणाचे तेज घेऊन त्या वावरल्या. त्यांच्या स्वाभिमानाची व समयसूचक बुद्धीची एक आठवण मोठी बोलकी आहे. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर श्री. लेमले यांना छत्रपती शाहू महाराजांनी
भेटीसाठी राजवाड्यावर निमंत्रित केले होते. गव्हर्नरांचे स्वागत राजेशाही थाटात झाले पाहिजे, ही महाराजांची इच्छा होती. पण महाराजांनी इंग्रजी गनरला हार घालावा ही संकल्पना सुमित्राराजेना पसंत नव्हती. स्वागत तर व्हावे, पण राजांनी आपला स्वाभिमान राखावा असा एक विचित्र पेच त्यांच्या मनात निर्माण झाला होता. राजाच्या उपस्थितीत दुसऱ्या व्यक्तीने गर्व्हनरांना हार घालणे हेदेखील राज रिवाजाला शोभेसे नव्हते, शेवटी सुमित्राराजेंनीच एक समयोचित असा, राजरिवाजाला साजेसा पर्याय सुचविला तो सर्वांनाच पसंत पडला. राजघराण्यात असलेल्या हत्तीकडून गव्हर्नरांच्या गळ्यात हार घालायचे ठरले. हत्तीला तसे शिक्षण दिले गेले आणि भेटीच्या वेळी हत्तीकडून गव्हर्नरांना हार अर्पण करण्यात आला. स्वागताला रुबाब प्राप्त झाला. राजघराण्याचा स्वाभिमान राखला गेला. पेच सुटला.
MUST READ
पु. ल. देशपांडे आणि चिवडा ....!
समाजजीवनातील असे कितीतरी पेच राजमातांनी सोडविले. समाजाला दिलासा दिला, पण काळाने छत्रपती शाहू महाराजांवर क्रूरपणे झडप घालून, वयाच्या २७ व्या वर्षी राजमातांच्या जीवनात विचित्र पेच निर्माण केला. सासूबाईच्या निधनानंतर राजमातांनी मोठ्या धैर्याने राजसंसार सांभाळला होता. अकाली वैधव्याने त्यांच्यावर आकाश कोसळले. रयत हळहळली. सत्त्वपरीक्षा पाहावी अशा कठीण प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जाऊन, शाहू महाराजांच्या मापारी आईसाहेबांनी छत्रपती प्रतापसिंह, विजयसिंह, अभयसिंह, शिवाजीराजे आणि सत्त्वशीलराजे यांना पित्याचे प्रेम दिले. संस्काराचे सामर्थ्य दिले. उत्तम शिक्षण दिले. आणि कर्तृत्वसंपत्र बनविले, स्वतः धैर्याने उभ्या राहिल्या. सामाजिक कार्यात समरस झाल्या.
त्यावेळी सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा वावर अत्यल्प असायचा. त्यावेळी |आईसाहेबांनी सातारा जिल्हा महिला मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटवली. शिवचरित्रातून सामर्थ्यसंपत्र नागरिक निर्माण व्हावेत म्हणून विविध उपक्रमांना चालना दिली. आपल्या ओजस्वी वाणीने | शिवरायांचा प्रताप घराघरांत पोहचविणान्या बाबासाहेब पुरंदरे यांना सदैव भेत्साहन दिले. 'शिवशाहोर' किताब देऊन त्यांचा उचित मान आईसाहेबांनी शिवकार्याचा वारसा उक्ती-कृतीने जपला. पं. नेहरू यांच्या हस्ते संपन्न झालेल्या प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी यशवंतराव चव्हाण, श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांना मोलाचे सहकार्य करून शिवभक्तीचे जाज्ज्वल्य दर्शन घडविले. शिवरायांचे ३०० वे पुण्यस्मरण भव्य स्वरूपात साजरे व्हावे म्हणून पुढाकार घेतला. त्यासाठी अथक प्रयत्न केले. आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच ३१ मार्च १९८० रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर आल्या. प्रचंड जनसागर पाहून भारावल्या. आईसाहेबांनी इंदिराजीना सोन्या-चांदीचा फाळ असणारा नांगर भेट देऊन शिवस्मृती जागवल्या. रायगडावरील मेघडंबरीचे उद्घाटन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते घेऊन आईसाहेबांनी इतिहासाला नवा उजाळा दिला.
आईसाहेबांचे जगणे गंगेसारखे पवित्र होते. आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची दक्षता घेणारे निर्मळ व प्रेमळ मन त्यांना लाभले होते. वेदनेने व्याकुळ झालेल्या कुटुंबावर मायेची फुंकर घालून, त्यांनी करुणा जपली होती. कोयनेच्या भूकंपाने बेघर झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मानवतेला साद घातली होती. भारत-पाक युद्धातील मृत जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून, मदत करून त्यांनी माणुसकी जपली होती.
दुःखितांना धीर दिलासा देणाऱ्या राजमाता खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. संयमी, सदाचारी, सौजन्यशील स्वभावामुळे त्यांच्या चरित्राला सुप्रतिष्ठीतपणा लाभला होता. कोणत्याही मोहावर विजय मिळवण्याचे मनःसामर्थ्य त्यांना शुभसंस्कारातून प्राप्त झाले होते. त्यामुळेच इंदिरा गांधीनी लोकसभेची निवडणूक लढविण्याची केलेली विनंती त्यांनी मान्य केली नाही.
राजकीय रणांगणापेक्षा त्यांना ईश्वराचे प्रांगण अधिक प्रिय होते. त्यांच्या देवघरात असलेले शिवलिंग, शंकराचार्य आणि श्रीगजानन महाराजांच्या प्रतिमा, देवदेवतांच्या मूर्ती भक्तिभावाने पुजण्यात त्यांना धन्यता वाटायची. सुखदुःखाच्या प्रसंगी सामान्य असामान्य असा भेदभाव न करता त्या त्या कुटुंबाशी भावसंवाद साधण्यात त्यांना आस्था असायची. परंपरेने वाट्याला आलेल्या राजसत्तेच्या माध्यमातून त्यांनी मृदूपणे समाजहित जपले. वाणीचे माधुर्य, चित्ताचे गांभीर्य आणि वृत्तीचे औदार्य लाभलेले एक राजश्रीमंत व्यक्तिमत्व म्हणून त्या कृतार्थ जीवन जगल्या. विविध संस्थांनी मानपत्रे, गौरवचिन्हे पुरस्कार देऊन त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 'साताराभूषण पुरस्कार देऊन गोडबोले ट्रस्टने त्यांचा सन्मान केला. रयतेने त्यांच्यात जिजाऊंचे नवे रूप पाहिले.
राजधानी सातारा त्रिशताब्दी महोत्सव समितीतर्फे आईसाहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एक गौरव प्रकाशित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. आईसाहेबांवर नितांत निष्ठा असणाऱ्या संभाजीराव पाटणे यांच्याकडे त्याचे संपादन होते. राजमातांविषयी लेख-फोटो पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्तम प्रतिसाद लाभला. आईसाहेबांच्या सहवासाचे सद्भाग्य लाभलेल्या अनेक लहान-थोर मंडळीनी अत्यंत भावस्पर्शी आठवणी लिहून पाठविल्या. हे सारे संकलन ग्रंथरूपाने प्रकाशित होण्यापूर्वीच राजमाता सुमित्राराजे भोसले' नामक जीवनग्रंथ ५ जून १९९९ या दिवशी मिटला.
राजमातांनी अनेक प्रसंगांतून आपल्या श्रीमंत मनाचे पुण्यशील दर्शन घडविले. इतिहासाच्या पानावर आपल्या विशाल मातृत्वाची मंगलमुद्रा उमटविली. जनतेला अमृतप्रेमाची संजीवनी दिली.
काळ कोणासाठी थांबत नाही, पण काळाच्या छातीवर पाय देऊन कणखरपणे ताठ मानेने जगावे कसे हे आईसाहेबांनी शिकवले. काळावर मात करणारी राजमातांसारखी वलयांकित व्यक्तिमत्त्वे इतिहास आपल्या कवेत घेतो. कलावंत त्यांना कवनात बांधतो. शिल्पकार त्यांना मूर्तीत साकारतो. मराठी माणूस तिथे नतमस्तक होतो आणि विनम्रपणे वंदन करतो.