क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिज्योती म्हणून गौरव होतो. समाजातील अज्ञानाचे अंधारे कोपरे त्यांनी प्रकाशमान केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर व तेजस्वी होते. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देऊन पहिली भारतीय शिक्षिका पडविली. उभयतांनी ज्ञानाची, विद्येची महती समाजावर बिबवली. हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजमनात ज्ञानज्योती फुलवून त्यांचे आत्मतत्व जागविले. जुनाट चालीरिती, कर्मपरंपराचे पाश तोडून दबलेल्या स्त्रीचे मनोधैर्य वाढविले. स्त्रीला अस्मितेचा नवा चैतन्यस्पर्श दिला. प्राणांची पर्व न करता सामाजिक समतेसाठी संघर्ष केला.
मानवधर्माच्या प्रसारासाठी सावित्रीबाईनी विपुल काव्यलेखन केले. निर्व्याज मानवता व उत्कट करुणा यांचे माहेर म्हणजे सावित्रीबाई होत्या. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. सत्यशोधक परिषदेचे कार्य केले. सत्त्वपरीक्षा पाहावी, असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. जोतीरावांनी आपल्या मृत्युपत्रात आपले दहन करू नका, दफन करा असे लिहिले होते. त्यासाठी घरामागे एक खड्डाही त्यांनी खोदून ठेवला होता. पण तसे घडले नाही. जोतीरावांवर अंत्यसंस्कार करावे लागले. जोतीरावांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी भाऊबंदांनी दत्तकपुत्र यशवंतला विरोध केला. तेव्हा सावित्रीबाई पुढे सरसावल्या व त्यांनी अग्नी दिला. ज्या जागेत जोतीरावांच्या अस्थी पुरण्यात आल्या. त्या जागेवर त्यांनी तुळशीवृंदावन उभे करून जोतीरावांच्या स्मृती सदैव जागृत ठेवल्या.]
READ ALSO
सामाजिक जीवनात आमूलाग्र व अर्थपूर्ण बदल करण्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटल्या. कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या नसानसांत होते. १८९६ च्या दुष्काळाने रयतेला पुरते पिडले होते. सावित्रीबाई अनधान्य-वस्त्र घेऊन गोरगरिबांच्या वस्तीत धावल्या.
[दुष्काळापाठोपाठ १८९७ मध्ये प्लेगने लोकांची बोबडी वळली. पुण्याच्या परिसरात प्लेगने थैमान घातले. बंदोबस्ताच्या नावाखाली, रँड नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने धुमाकूळ घातला. रोज शेकडो माणसे बघता बघता निपचित पडू लागली. एकाला पोचवून यावे तर दुसऱ्याला काखेत गाठ यायची. सावित्रीबाईंनी नगरपालिकेला पत्र लिहून डी.डी.टी. फवारण्याचे, उंदरांचे सापळे लावण्याचे कळविले. आपल्याजवळचे तांदूळ, ज्वारीचे वाटप सुरू केले. एकट्या सावित्रीबाई सेवाशुश्रूषा करणार तरी किती? त्यांनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतले व साव्यांच्या माळरानावर दवाखाना सुरू करायला सांगितले. स्वतः सावित्रीबाई वाड्या-वस्तीवर जाऊन लोकांना दिलासा देत होत्या.
प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने कोणी परका माणूस रोग्याच्या जवळ जायला धजत नव्हता. मग त्याला दवाखान्यात घेऊन जाणे दूरच, तिथे सावित्रीबाई स्वतः पुढे होत होत्या. प्लेगची लागण न झालेल्यांना यशवंतच्या दवाखान्यात लस टोचून घ्यायला सांगत होत्या. अगदीच अत्यावस्थ असलेल्यांकडे यशवंतला धाडत होत्या. यशवंतही आपल्या माता-पित्यांचे सेवेचे व्रत मनोभावे पार पाडत होता. औषधपाणी देत होता. पण प्लेग काही केल्या आटोक्यात येत नव्हता.
MUST READ
त्या दिवशी सावित्रीबाई मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या दलित वस्तीत गेल्या होत्या. लोक त्या माऊलीभोवती गोळा झाले. त्यातला एकजण आपल्या भाऊबंदाची कर्मकहाणी सांगत होता. "त्या गायकवाड महाराचं घर बसलं. त्यो नि त्याची बायको दोघंबी मेली आन् आता त्याचं लेकरूबी..." सावित्रीबाईनी ते काळजाला तडे देणारे शब्द ऐकले आणि तडक गायकवाडाचे घर गाठले. लेकरू तापाने फणफणले होते. तळमळत होते. बाईनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला छातीशी धरले. त्या लेकराचे नाव पांडुरंग बाबाजी गायकवाड, त्याला प्लेगची लागण झाली होती. मागचापुढचा विचार न करता पांडुरंगाला पाठीवर घेऊन त्या यशवंतच्या दवाखान्यात आल्या. यशवंतने उपचार केले पण दुसऱ्याच दिवशी त्या लेकराने मान टाकली. लोक हळहळले. सावित्रीबाईंच्या अचाट धाडसाचे, सेवेचे कौतुक करू लागले.
MUST READ
महात्मा गांधीजींची खादी आणी दाढी | एक अनोखा प्रसंग
[वणवण भटकून बाई दमल्या होत्या. अंगात कणकण भरली होती. तापाने अंग फणफणू लागले होते. त्यांची तपासणी करताना यशवंत एकदम चरकला. दचकला. सावित्रीबाईच्या काखेत गाठ उठली होती. बाईना प्लेगची बाधा झाली होती. १० मार्च १८९७ या दिवशी 'दीनबंधू'ने एक चैतन्यज्योत निमाल्याची बातमी दिली नि मानवतेलाही गहिवरून आले!
संदर्भ-चैतन्याचे चांदणे
संग्रह-नवल्या आर्टस्