श्रीमंत सयाजीराव गायकवाड
बालपणातच मुलांच्या चुणचुणीतपणाला वाव मिळाला तर त्यांचे भवितव्य किती सुंदर होऊ शकते, याची महती सांगणारा हा प्रसंग आहे.
बडोदे संस्थानचे महाराज खंडेराव यांचे १८७० ला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी त्यांच्या महाराणी जमनाबाई गरोदर होत्या, त्यांना मूल होईपर्यंत खंडेरावांचे भाऊ मल्हारराव यांच्याकडे संस्थानचा कारभार सोपवायचे ठरले. जमनाबाईना कन्यारत्न झाले आणि मल्हाररावांचे फावले. आता आपल्याशिवाय आहेच कोण?' म्हणून त्यांनी स्वतःची हत्तीवरून मिरवणूक काढली. मल्हारराव धूर्त व कपटी होते. त्यांच्या मनमानी कारभाराने रयत हैराण झाली. अखेर सरकारने मल्हाररावांना पदच्युत केले आणि जमनाबाईना दत्तकपुत्र घेण्याची परवानगी दिली.
'दत्तक कोणाला घ्यायचे?' जमनाबाईना नाशिक-मालेगावजवळच्या कवळण्याच्या गायकवाड वंशजांची आठवण झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर इलिएट यांना खात्री करायला सांगण्यात आले. त्यानुसार ते कवळण्याला घोड्यावरून गेले. खात्री केली आणि सूचनेनुसार गायकवाड वंशातील तीन मुलांना बडोद्याला पाठविण्याची तयारी केली. दादासाहेब, संपतराव व गोपाळ अशी तीन मुले निवडली. पैकी दोन शाळा शिकत होती. त्यातील गोपाळ गुरामागे हिंडायचा. गुराखीच तो! या तिन्ही मुलांपैकी एकाचीच निवड होणार होती. या तिघांना प्रथम नाशिकला आणून, त्यांच्या अंगच्या मापाचे कपडे शिवण्यात आले. नंतर तिघांना बडोद्याला रवाना केले. महाराणी जमनाबाईपुढे तिन्ही मुलांना सादर करण्यात आले. महाराणी चिकाच्या पडद्याआड होत्या. त्यांनी तिघांना एकच प्रश्न विचारला,
"तुम्हाला इथे कशासाठी आणले आहे?" पहिला म्हणाला, "माले काय माहीत?"
दुसऱ्याने सांगितले, "शाळा शिकाले."
आणि सर्वात शेवटी गोपाळने, हाताची मूठ उंचावत, बाणेदारपणे उत्तर दिले. "मी बडोद्याचा राजा होण्यासाठी आलो आहे."
या आत्मविश्वासपूर्ण उत्तराने महाराणी चमकल्या, गोपाळच्या तीक्ष्ण, भेदक डोळ्यांकडे पाहून आनंदल्या. त्यांना हा पोर निश्चयी, बुद्धिवान वाटला. विश्वासातल्या मंडळीना तिन्ही मुलांचे निरीक्षण करायला सांगितले. निरीक्षकांचे मत महाराणीच्या मताशी जुळले. गोपाळचे नाव बदलण्यात आले. सयाजीराव' असे नवे नामकरण झाले. सयाजीरावांना अश्वविद्या, धनुर्विद्या शिकवण्याचे फर्मान काढले. आणि एक दिवस सयाजीरावांची परीक्षा घेण्यासाठी वऱ्हाड शिक्षण खाते प्रमुख श्रीराम जठार यांना बोलविले.
महाराजांची प्रगती कौतुकास्पद होती. पण राज्याची धुरा सांभाळण्यासाठी. आवश्यक असते व्यवहारज्ञान! नेमकी याच ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी जठारसाहेबांनी आपल्या बोटातील अंगठी काढून सयाजीरावांसमोर धरली नि प्रश्न विचारला,
"ह्या अंगठीतून सयाजीराव जाऊ शकतील का?"
थोडा वेळ विचार करून सयाजीराव म्हणाले, "होय, जाऊ शकतील."
“कसे शक्य आहे?" सयाजीरावांनी टेबलावरचा कागद घेतला. खडूसारखी छोटी सुरनळी केली. त्यावर अक्षरे लिहिली.
'सयाजीराव...' आणि अंगठीतून ती सुरनळी आरपार करीत हळूच म्हटले, "हे असे जाऊ शकतील सयाजीराव!"
काय हो समयसूचकता! जठारसाहेब एकटक बघत राहिले चकित झाले. संकटातून मार्ग काढण्याचे कसब मुलाकडे निश्चितच आहे. तशी शिफारस केली. पुढे २८ डिसेंबर १८८८ रोजी सयाजीरावांचा राज्यारोहण समारंभ संपन्न झाला. महाराजांनी बालपणातच दाखविलेली कल्पकता आणि समयसूचकता पुढील वाटचालीला उपयुक्त ठरली.
एकदा झाले असे बडोद्यातल्या रावपुरारोडवर मौलानाबाबाची कबर होती. कबर रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे रहदारीला अडथळा करायची. महाराजांनी ज्येष्ठ मुस्लिम बांधवांना आमंत्रित करून अडचण सांगितली. उपाय सांगितला. तो समूहमानसशास्त्राशी निगडित होता. कबर रात्रीच्या वेळी खोदून गुपचूपपणे अर्धा फूट सरकावयाची आणि दुसऱ्या दिवशी मुल्ला-मौलवींनी एकच काम करायचे.
'मौलानाबाबाची कबर आपोआप सरकली, म्हणून अफवा पसरवायची. त्यानंतर महाराजांनी स्वतः पुढे येऊन समारंभपूर्वक कबरीवर हिरवी चादर टाकायची असे ठरले.
कबर रात्रीच्या अंधारात ठरल्याप्रमाणे अर्धा फूट सरकली. दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली. सरकलेली कबर पाहायला गर्दी लोटली. महाराजांनीही हिरवी चादर पेश केली. दोन-चार महिन्यांत कबर सरकत सरकत रस्त्याच्या कडेला आली. रावपुरारोड रूंद झाला. अडचण दूर झाली. 'पिवळा गेट दर्गा' म्हणून कबरही प्रसिद्ध झाली. 'अंगठीतून सयाजीराव गायकवाड असे जाऊ शकतात' या बालवयातील उत्तराची प्रचिती उत्तरवयात आली.
READ ALSO
सयाजीरावांच्या कल्पकतेची आणि समयसूचकतेची कदर महाराणी जमनाबाईनी केली. सयाजीरावांनी संधीचे सोने केले. 'राज्य ही जनतेची राजाकडे असलेली ठेब आहे. राजा तिचा प्रमुख विश्वस्त आहे असे समजून सता जनहितार्थ राबविणारे सयाजीराव गायकवाड हे कुशल प्रशासक होते, संस्थानातील ३५०० गावांपैकी २५०० गावांत त्यांनी शाळा सुरू केल्या. उद्योगधंद्याच्या प्रसारासाठी राज्यात रेल्वेचे जाळे पसरविले. बंदराच्या कामात लक्ष घालून दळणवळण-व्यापार बाढविला. ऑलिपिकसाठी उत्तम खेळाडू तयार करून क्रीडाक्षेत्राचे वैभव वृद्धिंगत केले. गोरगरिबांना सामाजिक न्याय दिला. शेतकऱ्यांना आधार दिला. कलावंतांना प्रोत्साहन दिले. ललितकलांचा विकास केला. साहित्य संमेलनाला आर्थिक मदत करून आपले रसिकत्व सिद्ध केले. राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान इ. विषयांतले उदंड वाचन केले. टिळकांचे 'गीतारहस्य' ते 'स्फूर्तिगीता' जमनाबाईनी खऱ्या हिऱ्याची पारख केली. त्यातूनच सयाजीराव महाराजांसारखे कलाप्रेमी, रसिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्व उभे राहिले.
संदर्भ -चैतन्याचे चांदणे