स्वामी विवेकानंद
हा प्रसंग जयपूरचा आहे. श्री स्वामी विवेकानंदांना भारत भ्रमंतीत पुष्कळ अनुभव आले. त्यातला हा एक स्वामीजींनाच अंतर्मुख करणारा अनुभव आहे. अनुभवातून व्यक्तीच्या आयुष्याला सुंदर आकार व अर्थ लाभू शकतो. पण अनुभवातून शहाणे होण्यासाठी मन उमदे असावे लागते. स्वामीजीकडे ते होते.. त्यांनी वाणीच्या माधुर्याने, बुद्धीच्या चातुर्याने, वृत्तीच्या औदार्याने व रूपाच्या सौदर्याने अनेकांना आकर्षित केले होते. खेत्रीचे महाराज अजितसिंग हे त्यापैकीच एक होते. स्वामीजीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. परमार्थाचे पसायदान गाणारे, मानवजातीचे श्रेष्ठ हितकर्ते व अलौकिक प्रतिभेचे साधुपुरुष म्हणून स्वामीजी त्यांना वंदनीय वाटत. पुढे त्यांच्याच विनंतीवरून 'विवेकानंद' हे नाव धारण करून स्वामीजींनी शिकागोच्या धर्मपरिषदेत भारतीय संस्कृतीला विश्वपातळीवर विराजमान केले.
तर याच खेत्रीच्या महाराजांनी आपल्या दिवाणखान्यात एका नर्तिकेचे गाणे ठेवले होते. स्वामीजींचा मुक्काम वाड्यावर होता. १८९१ चा एप्रिल महिना होता. वेळ रात्रीची होती. गाण्याचा आनंद स्वामीजीनी लुटावा, ही महाराजांची इच्छा होती. त्यांनी निरोप पाठवला. स्वामीजीना महाराजांच्या गाण्याच्या बेताची कल्पना नव्हती. ते दिवाणखान्यात आले. गाण्याची जय्यत तयारी झाली होती. नर्तिका दिखाणखान्यात येताच स्वामीजी चमकले. आपल्यासारख्या संन्याशाने अशा गाण्यात गुंतणे योग्य नाही, या जाणिवेने ते ताडकन उठले. जायला लागले. महाराजांनी त्यांना गाणे ऐकण्याचा आग्रह केल्याने ते बसून राहिले, पण कधी उठतील त्याचा नेम नव्हता.
स्वामीजींचे हे वागणे नर्तिकेच्या मनाला झोंबले. शेवटी कलावंत हा रसिकांच्या भावनेवर जगत असतो. तिने स्वामीजींच्या मनातले भाव जाणले. त्यांच्या मुखमंडलाकडे नम्रपणे पाहिले. अंतःकरणातील सात्विक भाव त्या साधुपुरुषाच्या मुद्रेवर विलसत होते. मोठ्या चतुराईने तिने गाण्याची निवड केली. राजस्थानातले संत कवी सुरदास यांचेच ते भजन होते. तंबोन्याच्या तारा जुळल्या. तबलजीची तबल्यावर थाप पडली. तिने षड्ज लावला, भजनाला प्रारंभ झाला, "प्रभू मेरे अवगुण चित्त न धरो समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो।" नर्तिका आर्त स्वरात सांगत होती, प्रभू आपण माझ्या अवगुणांकडे लक्ष देऊ नका. माझ्या हीन व्यवसायाकडे पाहू नका. आपल्याला समदर्शी म्हणतात. समदर्शी म्हणजे सान्या भूतमात्रांकडे समान दृष्टीने पाहणारे. तेव्हा आपण समदर्शी आहात. आपणच माझा उद्धार करा.
----------------------------------------------------------------------
read also
----------------------------------------------------------------------
रात्रीच्या समयी प्रकट झालेले नर्तिकेचे ते उत्कट व सुरेल सूर स्वामीजींच्या काळजाला भिडले. आणि ती अधिक उत्कटपणे आपल्या मनातले भाव गीतातून आळवू लागली. तिच्या गीतातील शब्दांना तिच्याच जीवनाचा सुंदर भावसंदर्भ होता. लोखंडाच्या एका तुकड्याची मूर्ती होते. ती देवघरात पुजली जाते, तर दुसऱ्या एका तुकड्याची सुरी होते. ती कसायाच्या हातात जाते. पण परिसाचा स्पर्श त्या दोन्हींचे सोने करतो, भेदभाव करीत नाही. आपणही परिस आहात.. आपल्या कृपेने माझा उद्धार करा. पाण्याच्या एका प्रवाहाला नदी म्हणतात, तर दुसऱ्याला नाला म्हणतात, पण दोन्ही प्रवाह गंगेला मिळतात. दोन्हीही पावन होतात. आपण पवित्र गंगा आहात. प्रभू आपल्या कृपेने माझा उद्धार करा.
एका संत कवीच्या साक्षात्कारी प्रतिभेतून अवतरलेल्या त्या गीताने स्वामीजींच्या हृदयाची तार छेडली. सुरांचा निनाद अंतःकरणाच्या गाभाऱ्यात घुमला. स्वामीजी अंतर्मुख झाले. खजील झाले. आपल्या उठून जाणाऱ्या कृतीने आपण एका कलावंताचा अपमान केला. कलावंताला पोट असतं, तसं मनही असतं. त्या नर्तिकेचे गाणे श्रेष्ठ होते. गाणारे मन स्वच्छ होते. पवित्र होते. अहंपणातून आपल्याकडून एक स्त्री कलावंत दुखावली गेली,
----------------------------------------------------------------------
read also
----------------------------------------------------------------------
स्वामीजी अस्वस्थ झाले. त्यांच्यातील करुणा जागी झाली. ते हळुवार पावलांनी नर्तिकेजवळ आले. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उमद्या अंतःकरणाने त्यांनी नर्तिकेची क्षमा मागितली. बिचारी ती नर्तिका धन्य धन्य झाली. जणू प्रत्यक्ष प्रभूनेच तिची कदर केली. तिच्या कलेला दाद दिली. तिचे मन उन्नत झाले. एका महापुरुषाकडून कधीही न सरणारी, संपणारी अशी प्रेमाची शिदोरी' तिला बिदागी म्हणून गवसली होती!
संदर्भ -चैतन्याचे चांदणे