श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी
प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात चिरंतन चैतन्याचा ताम्रपट लाभलेली काही व्यक्तिमत्त्वे असतात, ती मानवी संस्कृतीच्या विकासाला उंचीवर नेतात. स्वातंत्र्यपूर्व आठ वर्ष आपल्या संस्थानात निर्धाराने गांधीवादी ग्रामराज्याच्या प्रयोगाचा प्रारंभ करणारे आंधचे राजे भवानराव ऊर्फ श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी आजही आपल्यासमोर मानस्तंभासारखे उभे राहतात. एक प्रयोगशील, उपक्रमशील राजे म्हणून त्यांनी मानवतेची मुद्रा उमटविली.
आपल्या संस्थानात ४२ च्या लढ्यातील क्रांतिकारकांना उदार आसरा देणारा हा राजा स्वतःला छत्रपती शिवरायांचा निष्ठावान पाईक समजायचा. शिवरायांच्या जीवन चरित्रावर हा राजा स्वतः कीर्तने करायचा, स्वदेश, स्वधर्म यांचा संदेश देणारा हा राजा रयतेवर लेकराप्रमाणे प्रेम करायचा. अस्पृश्यतेचे त्याला वावडे होते. त्यामुळेच त्या काळी अधच्या राजवाड्याच्या स्वयंपाकगृहात एखादी दलित स्त्री स्वाभिमानाने काम करू शकत होती.
स्वदेशाभिमानी असणाऱ्या राजा भवानरावांनी परदेशी वस्त्र कधीच परिधान केले नाही. डौलदार तुरा असलेली लालभडक पगडी, अंगात बाराबंदीचा पायघोळ, रेशमी अंगरखा, पायात चुनेदार तुमान... असा हा रुवाबदार राजा रोज तीनशे सूर्यनमस्कार घालायचा. बलोपासना हा त्यांच्या निष्ठेचा विषय होता. आपल्या संस्थानातील शाळेतही त्यांनी सूर्यनमस्काराची सक्ती केली होती. राजाचे सूर्यनमस्काराचे प्रेम पाहून संस्थानातील काही चलाख शिक्षक मंडळी आपल्या बदली-बढतीसाठी, राजाच्या डोंगरवाटेवर सूर्यनमस्काराचे प्रदर्शन करायची. अर्थात राजाही चतुर होता. त्यांचा अंतस्थ हेतू ओळखायचा, त्यांना खडसवायचा!
अधच्या राजाचा हा 'सूर्यनमस्कारा'चा व्यायाम इंग्लंडमध्येही चर्चेचा विषय झाला होता. त्यावेळी राजा परदेश दौऱ्यावर होता. 'सन्डे रेफरी' या विलायती वृत्तपत्राने खोडसाळपणे राजाच्या धवल चारित्र्यावर काही शिंतोडे उडविले होते. काय तर म्हणे, ‘ह्या व्यायामाचा दंडक तरुण मुलींना लागू आहे. ह्या व्यायामामुळे मुली सडपातळ व सुंदर दिसू लागल्या, की हा राजा लगेच त्यांना आपल्या जनानखान्यात घालतो!' या राजाचे सुपुत्र अप्पासाहेब पंत यांनी सदर वृत्तपत्राला कोर्टात खेचले. अन् मग काय, संभाव्य धोके टाळण्यासाठी 'सन्डे रेफरी ने माफी मागून तीस हजार रुपयांचा दंड कोर्टात भरला. याच रकमेतून राजाने सूर्यनमस्काराचे देशभर प्रचारक नेमले. 'न्यूज क्रॉनिकल' या इंग्लंडच्या दैनिक वृत्तपत्राने तर सूर्यनमस्कारावर सहा लेख प्रसिद्ध केले. १९३७ मध्ये या लेखांचेच रूपांतर 'टेन पॉईंट वे टू हेल्थ' (पूर्ण आरोग्यासाठी दहा आसने) या पुस्तकात झाले. विशेष चमत्कार म्हणजे ह्या पुस्तकांच्या २२ आवृत्त्या निघाल्या,
औधाच्या राजाच्या प्रोत्साहनामुळेच बेळगावात सायकल रिपेअरिंग व नांगराचे फाळ तयार करणाऱ्या किर्लोस्कर बंधूंच्या प्रचंड उद्योगसमूहाची पायाभरणी आंध संस्थानात झाली. हा राजा कुशल प्रशासक होता. संस्कृतीचा उपासक होता नि कलेचा भोक्ता होता, तो परिसस्पर्शी होता.
झाले असे, कुंडलच्या शाळेतला एक पोरगा भलताच वात्रट होता.. भल्याभल्यांच्या खोड्या काढायचा नकला करायचा. अगदी राजाचीही। पहाडी आवाजात गायचा. राजाने त्याच्या पाठीवर मायेने हात ठेवून सांगितले, "नकला ठोक, पण टिगल नको. अरे बाळ, जगदंबेने तुला उत्तम आवाज दिला आहे. या दैवी देणगीचा उपोयग लोकसेवा, लोकजागृती, पतितोद्धाकरिता कर... तुझे कल्याण होईल." राजाचा आशीर्वाद फलद्रुप झाला. हाच मुलगा पुढे स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम म्हणून मान्यता पावला.
..ग. दि. माडगूळकर हेसुद्धा औध संस्थानातील बोर्डिगचे विद्यार्थी, जगदंबेच्या परडीतले अत्र खाऊन आपल्या संस्थानाचे नाव उज्ज्वल करणारा अभिजात कलावंत म्हणून ग.दि.मां.बद्दल राजा भवानरावांची छाती अभिमानाने फुलायची. असंख्य गोरगरीब पोरांना आपल्या खास पंगतीत बसवून पंचपक्वानांची मेजवानी देणारा हा राजा मनाने मोठा दिलदार होता. राजाने भोजनगृहातही एक फळा ठेवला होता. त्यावर रोज एक श्लोक लिहिला जाई. त्याचे अर्थपूर्ण स्पष्टीकरण करून राजा तो श्लोक मुलांना पाठ करायला सांगे, पोटातल्या सात्त्विक अन्नाबरोबर असे संस्कृत सुभाषितांचे चर्वण होई. एका परीने राजाचे भोजनगृहही सुसंस्काराची
भोजनशाळाच झाली होती. आचार्य अत्रेच्या 'गुरुदक्षिणा' नाटकात विद्यार्थीदशेतील ग.दि.मां.नी वक्रदंताची भूमिका केली होती. ही विनोदी भूमिका पाहून राजा 'वाहवा' म्हणत पोटभर हसला. या नाटकानंतरच्या बक्षीस समारंभात प्रथम बक्षिसासाठी नाव पुकारले, ते गोखले नावाच्या एका मुलाचे. त्याने सुदाम्याची भूमिका केली होती, गोखले एकदम हडकुळा, अगदी पाप्याचे पितर राजाने त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. पण तो हळहळला. "औंध संस्थानात सुदाम्याचं काम करण्यासाठी असा विद्यार्थी सापडावा, याचं आम्हाला फार वाईट वाटतं."
राजाच्या बोलण्याने सारी मुलं चिडीचूप झाली. सुदाम्याच्या हातावर बक्षीस ठेवत राजा म्हणाला, "पुढच्या वर्षी याच नाटकात तुम्ही बलरामाची भूमिका केली पाहिजे." राजाचा उद्देश व्यायाम केला पाहिजे. 'सुदामा' घामाघूम होऊन जागेवर बसला.
त्यानंतर बक्षिसासाठी पुढचे नाव पुकारले ते ग.दि.मां.चे. राजाने त्यांची जोरदार पाठ थोपटली. एखाद्या पैलवानांसारखा दंड गच्च पकडून लोकांना सांगितले, "पुढे हा मुलगा हास्याचे डोंगर उत्पन्न करील." राजाने ग.दि.मां.च्या कलेचे मनमुराद कौतुक केले. पुढे सारे राजाज्ञेप्रमाणे घडले. ग.दि.मा. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिक झाले. गीतरामायणातून घराघरात झंकारत राहिले. त्यांच्या ग्रंथांना, चित्रपटकथांना, गीतांना अनेक पुरस्कार लाभले.
ग.दि.मां.चीच कथा असलेल्या 'दो आँखे बारह हाथ' चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक लाभले. या चित्रपटातील गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा प्रयोग औधच्या राजा भवानराव यांनी प्रत्यक्ष आपल्या संस्थानात राबविला होता. ग.दि.मां.नी तोच प्रयोग या चित्रपटकथेसाठी वापरला. आणि औंधाच्या मुलखावेगळ्या राजाचा रूपेरी सन्मान झाला. पण अनेकांना नवी दृष्टी देणारा हा राजा मात्र हा 'दो आँखे बारह हाथ'चा सन्मान पाहू शकला नाही. कारण त्यापूर्वीच १३ एप्रिल १९५१ रोजी भर दिवसा हा औंघाचा आदित्य दृष्टीआड झाला होता.