यशवंतराव चव्हाण यांचा न ऐकलेला प्रसंग | The untold Story of Yashvantrao Chavan | Yashvant Rao Chavan |

Yashvantrao Chavan Quotes

यशवंतराव चव्हाण


साहित्य, कला आणि राजकारण यामध्ये समन्वय साधणारे यशवंतराव चव्हाण हे रसिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. शब्दांच्या सामर्थ्यावर त्यांचा नितांत विश्वास होता. माणसाने भाषा निर्माण केली. आता भाषेला सुजाण माणसे निर्माण करावी लागतील, हे त्यांचे मत आजही पटते. विचार, भावना आणि कल्पना यांच्या बळावर त्यांनी सकस ग्रंथनिर्मिती केली. 'कृष्णकाठ' हे त्यांचे आत्मचरित्र मराठी माणसाचे अक्षरतैभव आहे. समाजकारणाचा ध्यास आणि साहित्याचा सहवास हा त्यांचा श्वास असल्यानेच त्यांच्या शब्दकृतीना शहाणपणाचा सुवास येतो. जनतेच्या प्रेमाची शक्ती ज्याच्याजवळ असते, तोच समर्थ मनुष्य बनतो, ही त्यांची विचारधारा होती.


यशवंतरावांनी सांगितलेली, जनतेच्या प्रेमाची एक आठवण मोठी बोलकी आहे. त्यातून त्यांच्या सौजन्यशील व संवेदनशील स्वभावाचे भावोत्कट दर्शन घडते.

शिवनेरी किल्ल्याचा शिवजन्मापूर्वीचा इतिहास | शिवनेरी किल्ला कोणत्या राजाने व का बांधला? | जाणून घ्या

यशवंतराव मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते. लोक त्यांना आदराने 'साहेब' म्हणायचे. साहेब येणार म्हटले को सभेसाठी गर्दी व्हायची. माणूस मोहरून जायचा. सहजपणे अंतर्मुख व्हायचा. साहेब सभास्थानी येईपर्यंत ठिकठिकाणी लोक त्यांना हारतुरे घालायचे


साहेब पैठण तालुक्यातून प्रवास करीत होते. एका छोट्या गावाशेजारी पाच पंचवीस घरांची वाडी होती. रस्त्याच्या कडेला काही माणसे गप्पाटप्पा मारीत बसली होती. साहेबांनी ते पाहिले. तेथे कोणी हारतुरे घेऊन उभे नव्हते, की नेत्यांच्या प्रेमाची जाहिरात करण्यासाठी भलीमोठी कमानही उभारली नव्हती, तरी का कोणास ठाऊक, यशवंतरावांना तेथे गाडी थांबवावीशी वाटली. कार्यक्रमाला तसा उशीर झाला नव्हता. त्यांनी माणसांच्या घोळक्यापाशी गाडी थांबविली. मुख्यमंत्र्यांची गाडी ती!


दोन म्हातारी माणसे गाडीजवळ आली. 'चव्हाणांची गाडी काय?'

गाडीतून उतरतच साहेब 'होय' म्हणाले नि माणसांत मिसळले. 'मीच चव्हाण, आपल्याला काय सांगायचे आहे का?"


साहेबांनी आजूबाजूला नजर फिरवली. इच्छा एकच, काही अडीअडचणी असतील तर चर्चा करावी, काही तक्रारअर्ज असतील तर घ्यावेत, शक्य झाल्यास तक्रार निवारण करावे, जनतेचा आशीर्वाद घ्यावा, 'नमस्कार' म्हणावे नि पुढे जावे. पण घडले वेगळेच!


एक म्हातारे गृहस्थ पुढे आले. त्यांचे हात कापत होते. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी खिशातून एक पिशवी काढली. साहेबांना वाटले, काही तक्रार अर्ज द्यायचा असेल, पण त्या गृहस्थांनी पिशवीतून तक्रारअर्ज नाही काढला! फुलांचा हारही नाही काढला! त्याने काढला होता रुपया रुपयांचा दहा-पाच नोटांचा बांधलेला एक छोटा हार!

जुन्नर चा ताजमहाल पाहिला का ..?

यशवंतराव चकित झाले. या मराठवाड्यामध्ये, हैदराबादच्या जुन्या राज्यामध्ये असा नोटांचा हार देण्याची पद्धत असावी, असे त्यांना वाटले, तो हार त्यांनी नम्रपणे स्वीकारला तसे त्या वृद्ध गृहस्थाचे डोळे पाणावले. यशवंतराव त्या गृहस्थाला म्हणाले, "आजोबा, मला वाटले होते, तुम्ही एखादा अर्ज द्याल, पण तुम्ही हे काय देता? मी या पैशांचे काय करू ?"


तो वृद्ध आता काय बोलणार या कुतूहलाने सारेच जण त्याच्या चेहऱ्याकडे


एकटक बघू लागले. त्याने शांतपणे यशवंतरावांकडे पाहून उत्तर दिले, "बाबा, तुझ्यासारखा पुत्र व्हावा, अशी माझी इच्छा होती. तुला खाऊला हे पैसे आणले आहेत.”


यशवंतरावांचे वडील लहानपणीच वारले होते, त्यांना मातृप्रेम उदंड लाभले, पण पितृछत्र लाभले नाही. त्या वृद्ध गृहस्थाच्या उत्तराने ते एकदम गहिवरले. या वयातही मराठवाड्याच्या मातीमध्ये आपल्याला खाऊला पैसे देणारा पिता आहे. हे पाहून डोळ्यांत अश्रू दाटले. मराठी माणसाची माया बघून मन भरून आले.


'राज्ये जी चालतात ती राज्ये चालविण्याच्या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात, त्यांच्या पुण्याईने चालतात, ती माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात, त्यांच्या साहाय्याने ती चालतात. या विचारतत्त्वावर यशवंतरावांची श्रद्धा होती. यामुळेच जनतेजवळ वत्सल मातेचे व प्रेमळ पित्याचे हृदय असते, याची त्यांना प्रचिती आली.


आजही समाजात राज्यकत्यांना पैसे देणारे पुष्कळ हात आहेत, पण ते हात निरपेक्ष नाहीत आणि पैसे निरपेक्षपणाने देणारे हातही पुष्कळ आहेत. पण ते घेणान्यांचे हात मात्र साहेबांसारखेच पवित्र दिसत नाहीत, हीच खरी खंत आहे.

संदर्भ-चैतन्याचे चांदणे

संग्रह-नवल्या आर्टस्

Previous Post Next Post