जिद्दीचे बाळकडू
गुरुवर्य देवघर
साताऱ्याच्या मातीवर न्यू इंग्लिश स्कूलची उभारणी करणारे गुरुवर्य सीतारामपंत देवधर हे ज्ञानप्रकाशाचे पूजक होते. 'स्वयंप्रेरणा' ही या सरस्वतीपुत्राच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली होती. शिल्पकार जसा दगडातील नको तो भाग छिन्नीने उडवितो आणि दगडातून सुंदर मूर्ती घडवितो, तसे गुरुवर्यांनी स्वतः आपले आयुष्य घडविले आहे. ते खरोखर स्वयंशिल्पी होते.
साताऱ्यातील अदालतवाड्याजवळ गुरुवर्यांचे घर होते. घराजवळ पिंपळाचे झाड होते. झाडाभोवती पार बांधला होता. या पारावर बसून लहानगा सीताराम येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना आपल्या घरातील हळदी-कुंकवाचे निमंत्रण देत होता. घरात येणाऱ्या स्त्रियांची वाढती गर्दी पाहून सरस्वतीबाई चकित झाल्या लेकराची करामत त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला घरात बोलावून सांगितले, "बाळा, अरे ज्याला त्याला असे निमंत्रण देऊ नये, घरातले हरभरे संपल्यावर मी बायकांच्या ओटीत काय घालू!" गरिबी मोठी वाईट असते.
सीतारामने पुन्हा तडक पार गाठला आणि तो प्रत्येक स्त्रीला विनवू लागला, "आमच्या घरी हळदी-कुंकवाला जाऊ नका. आमच्या घरचे हरभरे संपतील.”
स्त्रिया हळदी-कुंकवास का येईनात हे पाहण्यासाठी मातोश्री घराबाहेर आल्या. तर तेथे सीतारामचे जाहीर निवेदन जोरजोरात चालू होते. माऊलीने एकच उपाय केला... लेकराला घरी आणले आणि गरिबीचे जाहीर प्रदर्शन थांबवले. याच राहत्या घरावरून शेजारपाजारची मंडळी मायलेकरांना हिणवायची. त्यावेळी लहानगा सीताराम छाती फुगवून सांगायचा, “तुम्ही काय समजलात? एक दिवस मी माझ्या घराची माडी पिंपळास लावीन.'
ALSO READ
सावित्रीबाईच्या काखेत गाठ उठलीआणि सावित्रीबाई फुले यांची चैतन्यज्योत निमली
हे शब्द गुरुवर्यांनी १९०२ मध्ये खरे करून दाखविले. जुन्या जागेवर त्यांनी स्वकर्तृत्वाने नवे घर बांधले. त्याची माडी अक्षरशः पिंपळाला टेकली. गुरुवर्यांचे जीवन खडतर होते. ते कुठे डगमगले नाहीत. बालपणात गरिबं
आणि पोरकेपण संगतीला घेऊन त्यांनी प्रगती साधली. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात ज्ञानाची ज्योत जागती ठेवली. खरं तर बालवयात मार्गदर्शन करावे असे घरामध्ये कोणी वडीलधारी नव्हते. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. ते नाटकाकडे वळले. रंगभूमीच्या रंगीत दुनियेत अंतर्मुख झाले. आत्मशोध घेतला. पुन्हा विद्यार्थीदशा स्वीकारली. वार लावून जेवले. मन लावून अभ्यास केला. शिक्षक, नाटककार, वृत्तपत्र संपादक, लेखक, वक्ता या नात्याने समाजप्रबोधन केले. मोठ्या जिद्दीने साताऱ्यात न्यू इंग्लिश स्कूलची उभारणी केली. आता या शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. 'दगडी शाळा' म्हणून गाजलेल्या या शाळेच्या 'पायाचा दगड' गुरुवर्यांनी रोवला आहे. त्यावरच आजची प्रशस्त वास्तू डौलाने उभी आहे.
महात्मा गांधीजींची खादी आणी दाढी | एक अनोखा प्रसंग
मराठी माणूस जिद्दी आहे, कर्तबगार आहे. यावर गुरुवर्य देवधरांचा विश्वास होता, पण त्याला कष्टाची लाज वाटते, याबद्दल त्यांना चोडही यायची. आपल्या वर्गातील मुलांना ते नेहमी एक प्रसंग सांगायचे.
एकदा एक बंगाली पदवीधर न्यूयॉर्क येथे गेला. रस्त्याने चालला असता त्याचे लक्ष एका दहा-बारा वर्षांच्या चांभाराच्या मुलाकडे गेले. त्या मुलाने या भारतीय पदवीधराला 'बूट पॉलिश करून देऊ नका?' असे विचारले. खरे तर बुटाला पॉलिश करण्याची त्याला गरज होती, पण त्या पदवीधराकडे
तितके पैसे नव्हते. तसे त्याने त्या मुलाला सांगितले. तो मुलगा त्याच्याकडे पाहून
हसला आणि त्याने त्या दांडग्या पदवीधराला सल्ला दिला.
"तुम्ही एक पेनी खर्च करून एक केरसुणी विकत घ्या. त्या केरसुणीने या दुकानापुढील जागा झाडून साफ करा म्हणजे त्याबद्दल तुम्हाला दोन पेनी मिळतील. थोडे दिवस काम केल्यावर तुमच्याकडे पैसे साठतील. मग दुसरा अधिक किफायतशीर धंदा करा. नंतर त्यापेक्षा चांगला धंदा करा. तुम्हास अधिकाधिक पैसा कमवता येईल. मी तर काय साऱ्या जन्मभर 'बुटांना पॉलिश करायचे का पॉलिश ? असे बोडेच ओरडत राहणार आहे? अहो, मी ही एक दिवस या युनायटेड स्टेट्सचा प्रेसिडेंट होईन. मला तशी उमेद आहे."
एका पेनीने उद्योगधंद्याला सुरुवात करायला सांगून, प्रेसिडेंटचे स्वप्न पाहणारा हा धडपड्या मुलगा आपल्यालाही जिद्दीचे बाळकडू पाजतो.
आमचे शिक्षण आम्हाला श्रमापासून बचाव करायला शिकवते, ते सज्जन
होण्यासाठी संस्कार करते. श्रीमंत होण्यासाठी श्रमाची तयारी लागते. आत्मविश्वास, शिस्त आणि नियोजनाची दीक्षा घ्यावी लागते. इच्छाशक्ती जोपासावी लागते. कष्टाची लाज न बाळगता, उपजत कलागुणांचा वापर करून स्वजीवनाची उन्नती साधता येते, हेच 'जिद्दीचे बाळकडू' गुरुवर्य आम्हाला देतात.
संदर्भ - चैतन्याचे चांदणे