डॉ. आनंदीबाई जोशी
खडतर परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रातील एम. डी. पदवी संपादन करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची जीवनयात्रा मानवी मन थक्क करणारी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन जे यश प्राप्त केले ते केवळ अलौकिकच नाही, तर चित्तथरारक आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आनंदीबाईनी अक्षरशः वादळवाच्याशी टक्कर दिली. प्रचंड अवहेलना पचविल्या. कल्याणच्या गणपतराव दादा जोशी-इनामदार यांची ही कन्या रूपाने साधारण, रंगाने सावळी, बुद्धी तल्लख तिचे हात पिवळे करण्यासाठी वडील उतावीळ झाले होते. त्या काळात नऊ वर्षांची पोर म्हणजे बापाला घोर असायचा.
आनंदीचे लग्न जुळत नव्हते. वडील चितेत पडले होते. सोमणभटजींनी एका विधुराचे स्थळ सुचविले. गोपाळराव जोशी यांचे. अंगकाठीने बारीक व रूपाने सावळे, असे हे ध्यान मोठे विक्षिप्त होते. ठाण्याच्या पोस्टात कारकून होते. 'नोकरी' एवढीच काय ती जमेची बाजू होती. पहिल्या भेटीत त्यांनी आनंदीचे स्वळ धुडकावून लावले. आपण विधवेशीच विवाह करणार असल्याचे सांगून 'स्थळ' घेऊन आलेल्या मंडळीसमोर ते इंग्रजीचे पुस्तक वाचत बसले. आनंदी बाळबोध वाचते, हे समजल्यावर मुलगी बघायला आले. लग्नानंतर पत्नीला पुढे शिकवण्याच्या अटीवर लग्नासाठी होकार दिला. तारीख, मुहूर्त ठरला, पण मनात विधवेशीच विवाह करण्याचा निर्धार होता. मुंबईच्या कुण्या गृहस्थाने तसे स्थळ सुचविले, नि स्वारी त्या दिशेला पळत गेली. इकडे लग्न, तारीख, मुहूर्त टळला. नाव आनंदी पण तिच्या जीवनात दुःख यातनांचेच डोंगर होते. याचाच एक भाग म्हणजे लग्नयोग गोपाळरावांशीच जुळला.
लग्नानंतर गोपाळराव कल्याण मुक्कामी राहून नोकरी करू लागले. आनंदीच्या शिकण्यावरून बराच संघर्ष झाला. गोपाळरावांनी आकांडतांडव केले. बिचाऱ्या आनंदीचे हाल झाले. घरातले तिला शिकू देईनात. तर नवरा घरातले काम करू देईना. गोपाळरावांनी अलिबागला बदली करून घेतली. सोबत आजीने यायचा हट्ट धरला, आनंदीला हळूहळू अभ्यासाची गोडी लागली. इतिहासातले पराक्रम निः भूगोलातले हवामान मानवायला लागले. आजीला हे अजिबात पसंत नव्हते, पण नाइलाज होता. आनंदीला दिवस गेले. यानिमित्ताने पोर पुस्तकाच्या कचाट्यातून सुटेल म्हणून बरे वाटले, पण कसले काय? एक दिवस नातजावयांनी मुंबईहून डोहाळ्यानिमित्त आनंदीला एक जाडजूड पुस्तक आणि मऊमऊ बूट आणले. जोडी समुद्रावर फिरायला जाऊ लागली. पोर रुढीविरुद्ध पावले टाकते, पाहून आजी चिडचिड करायची.
also read
आणि सावित्रीबाई फुले यांची चैतन्यज्योत निमली | How savitribai fule died | Savitribai Fule
आनंदीला शिकवण्याच्या ध्यासाने गोपाळराव एवढे पछाडले होते, की ओल्या बाळंतपणातही ते तिला गृहपाठ देत होते. नोकरीवरून परत येईपर्यंत तो झाला नाही. तर जीवघेणा अपमान करीत होते. आनंदीच्या कुशीतल्या लेकराकडे तऱ्हेवाईक नजरेने पाहून सर्वांना घायाळ करीत होते. शेवटी तापात मूल गेले. आनंदीला रिकाम्या पाळण्याकडे पाहून हुंदके आवरत नव्हते. संस्कृत, इंग्रजी शिकण्यात मन लागत नव्हते; नवऱ्याने धीर देताना एक जबर अभ्यासाचा डोस दिला, "हे बघ मुलं सगळ्यांना होतात. काही जगतात, काही मरतात, तू मनाला लावून घेऊ नकोस. आता वेळ न घालवता उद्यापासून अभ्यासाला लागायचं देवाच्या मनात तू अभ्यास करावं असंच होतं. तू इतकी शिक की, लोकांनी म्हणावं अशी बाई झाली नाही."
आनंदीच्या वाट्याला आलेला कर्मभोग मोठा विचित्र होता. गोपाळरावबरोबर समुद्रावर फिरायला जाणे नि शिकणे हा लोकांच्या चेष्टेचा विषय झाला होता. आजीच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर उपाय म्हणून गोपाळरावांनी कोल्हापूरला बदली करून घेतली नि आजीबाईना कल्याणला धाडले. कोल्हापूरात त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांशी मैत्री वाढविली. आनंदोला मिशन स्कूलमध्ये पाठवायचे ठरविले. शाळा गावापासून लांब होती म्हणून स्कूल मॅडमच्या बग्गीतून जाण्याची व्यवस्था केली. मॅडमच्या पायाजावळ बसून शाळेत जाणे आनंदीला लाजीरवाणे वाटू लागले. नवऱ्याच्या आक्रस्ताळी स्वभावामुळे सारे मुकाट्याने सहन करावे लागले. काही मराठी मंडळीनी याला विरोध केला. मग गोपाळरावांच्या डोक्यात एक भव्यदिव्य स्वप्नाने काहूर माजविले. आनंदीला शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवायचे! त्यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंकडेही जाणे-येणे वाढविले बायबलचा अभ्यास केला. हिंदू धर्माची यथेच्छ निंदानालस्ती केली. पाद्रीवर प्रभाव टाकून मिस्टर बाईस्डर यांना 'अमेरिकेचे निमंत्रण देण्याविषयी पत्रव्यवहार केला, पण गोपाळरावांच्या धर्मांतर नि देशांतराचा अंतःस्थ हेतू अमेरिकन मंडळीनी ओळखला. धर्मांतर करून भारतातच धर्मप्रसार करण्याचा सल्ला दिला. मन खड्डू झाले.
एका ठिकाणी रमणे हा गोपाळरावांचा पिंडच नव्हता. त्यांची मुंबईतील गिरगावच्या पोस्ट ऑफिसात बदली झाली. तेथून कोलकत्याला. कोलकत्यातील एक पत्र आनंदीच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यादिवशी गोपाळराव खुशीत होते. त्यांचा व मिस्टर बाईस्डर यांचा पत्रव्यवहार अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तो वाचून अमेरिकेच्या कापेंटर नावाच्या स्त्रीने आनंदीच्या नावाने पत्र पाठविले होते. त्या पत्रात गोपाळरावांची अभ्यासू वृत्ती व पत्नीला शिकवण्याची तळमळ, यांचे कौतुक केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय कुटुंबाशी मैत्री वाढविण्याची इच्छा मिसेस कापेंटर यांनी व्यक्त केली होती. जोशी- कार्पेटर कुटुंबाची पत्र मैत्री एवढी वाढत गेली, की शेवटी त्याच मैत्रीच्या धाग्याने आनंदीबाईना अमेरिकेत ओढून घेतले.
आनंदीबाईचे समुद्रपर्यटन नि परदेशगमन मोठे वादळी ठरले. घरच्या मंडळीनी प्रथम विरोध दर्शविला. वृत्तपत्रांनी धर्मबुडीचे काहूर उठविले. कोणीकोणी तर पोलीस कमिशनरची गाठ घेऊन गोपाळरावांना तुरुंगात अडकविण्याचे प्रयत्न केले. मुळात आनंदीबाईंची परदेशी शिक्षणाला संमती असल्याने कोणाचेही काही चालले नाही. आपल्या विवेकबुद्धीला पटलेला निर्णय अमलात आणताना मोठी माणसे कच खात नाहीत. गोपाळरावांनी प्रथम प्रवास व मेडिकल कॉलेजविषयों माहिती मिळवून खर्चाची तरतूद केली. फिलाडेस्फियाला 'पेनसिल्व्हानिया' हे स्त्रियांचे मेडिकल कॉलेज होते. तेथे मॅट्रिक परीक्षेला बसण्याची सोय होती. तो परीक्षा उत्तीर्ण झाले, की मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळणार होता.
also read
आनंदीबाईनी मोठ्या हिमतीने स्वबळावर एकटीने अमेरिकेपर्यंत प्रवास केला. आनंदीला निरोप देताना गोपाळरावांचे डोळे पाणावले होते. आजवर आपण तिला किती छळले. या विचाराने ते क्षणभर अंतर्मुख झाले. आपले स्वप्न साकार होत असल्याचे पाहून मन कृतार्थ झाले. कोलकत्याच्या भरगच्च निरोप समारंभात आनंदीने आत्मविश्वासपूर्वक केलेल्या इंग्रजी भाषणाच्या आठवणीने त्यांच्या मनात कौतुकाचे भाव दाटले.
आनंदीबाईनी अमेरिकेत आपले भारतीय रीतिरिवाज सोडले नाहीत. आपले पावित्र्य अबाधित राखले. थंडीवाल्यापासून बचाव करण्यासाठी गुजराती पद्धतीने साडी परिधान केली. शाकाहारी खाण्याच्या अट्टहासाने मैत्रिणीची नाराजी ओढवून घेतली. अत्राची आबाळ झाल्याने कधीकधी चकवा येई. अंगात बारीक ताप राही. एका धुरकट खोलीत काटकसर करीत मोठ्या जिद्दीने मॅट्रिक उत्तीर्ण होऊन आनंदीबाईनी वैद्यकीय शिक्षणाचा गढ लढविला. कार्पेटर कुटुंबाचे मनस्वी प्रेम संपादन केले.
एकदा न्यूयॉर्कजवळील हायलंडच्या पार्कच्या निसर्गात बागडताना पामिलाने आनंदीचा फोटोग्राफरकडून फोटो काढला. आनंदीने तो गोपाळरावांना पाडला. हसऱ्या चेहऱ्याचा, पदर वान्यावर उडत असल्याचा फोटो पाहून गोपाळरावांचे तिरकस पत्र आले. 'चेहरा हसरा आहे, पण कुणाकडे बघून हसलात? तो भाग्यवान कोण? आपला ढळलेला पदर पाहून ऋषीमुनीना काय वाटेल?' आनंदीच्या मनाच्या चिंधड्या उडविणारी अशी पत्रे येत होती. अशा परिस्थितीत आनंदी प्रथम वर्गात पास झाली. डॉक्टर झाली, मिस्टर कापेंटर यांनी अभिनंदन केले.
आनंदीबाईना कर्मठ धर्मरूढी, तिरसट नवरा नि बोचरा वारा अशा अनेक पातळीवर संघर्ष करावा लागला, पण त्या डळमळल्या नाहीत. गोपाळरावांनी अमेरिकेला संन्याशाच्या वेशात येऊन धमाल उडवून दिली. तेव्हा त्या बिथरल्या. लगेच सावरल्या. गोपाळरावांची परदेशी स्थायिक होण्याची इच्छा होती, पण आनंदीबाईच्या तब्येतीला स्वदेशीच हवा मानवेल, अशी तिथल्या डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ते स्वदेशी परतले.
वृत्तपत्रांनी उभयतांचा गौरव केला खरा, पण आता बाईची तब्येत पुरती ढासळली होती. अंगात ताप मुरला होता. खोकला वाढला होता. जीवाची तगमग होत होती. देहाचा सापळा झाला होता. क्षयरोगाने सारे शरीर गळटून गेले होते. मस्तकात वैद्यकीय ज्ञानाचा साठा असून, त्याचा उपयोग करता येत नव्हता. पुण्यातील नामांकित वैद्यराजांनी 'असल्या बाया जगल्या काय अन् मेल्या काय, माझी विद्या मला बाटवायची नाही' असं जहरी उत्तर देऊन आनंदीबाईना औषध घायला नकार दिला. एकूणच चिमुरड्या यमूपासून ते डॉ. आनंदीबाई जोशीपर्यंतची जीवनयात्रा मनाचा थरकाप उडविणारी आहे. भारतीय लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी आनंदीबाईंना आयुष्यच लाभले नाही, पण ही पदवी मिळविण्यासाठी त्यांनी इतिहासाच्या पानावर जे दिव्य कर्तृत्व कोरले आहे. ते भारतीयांना चिरंतन प्रेरणादायी नि चैतन्यदायी असेच आहे.